लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करू, ज्याठिकाणी पाणी येणार नाही, अशा जागी त्यांचे पुनर्वसन करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली. पूरग्रस्तांची भेट घेत त्यांना दिलासा देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
महापुराच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री पवार सोमवारी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी स्टेशन चौकात पुराची पाहणी केली. त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे होते. स्टेशन चौकात आयुक्त कापडणीस यांनी पुराची माहिती दिली. यावेळी पवार यांनी शहरातील विद्युत व पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाकडे विचारपूस केली. आयुक्तांनी पुराचे पाणी आलेल्या भागातील विद्युत पुरवठा खंडित असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केल्याची माहिती दिली.
त्यानंतर पवार यांनी दामाणी हायस्कूल येथील मदनभाऊ पाटील युवा मंचच्या निवारा केंद्राला भेट देत पूरग्रस्तांची विचारपूस केली. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, आनंद लेंगरे, सिकंदर जमादार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पूरग्रस्तांनी निवारा केंद्रात चांगल्या सुविधा मिळत असल्याचे सांगितले. पवार यांनी ज्या भागात पाणी येते, तेथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.