देशिंग : खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील नरसीम्मा दगडाच्या खाणीत दगडवाहू डंपर (एमएच ०७- १८६०) कोसळून चालक बाळासाहेब आनंदा घोरपडे (वय ५५) हे जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. खरशिंगपासून दोन किलोमीटर अंतरावर मिरज-पंढरपूर राज्य मार्गालगत नरसीम्मा स्टोन क्रशर आहे. या क्रशरवर गेल्या अनेक वर्षांपासून खडी निर्मिर्तीचे काम केले जाते. यासाठी जवळच असलेल्या सुमारे साठ फूट खोल खाणीतून डंपरमधून दगडाची वाहतूक केली जाते. शनिवारी रात्रीही नेहमीप्रमाणे डंपरचालक बाळासाहेब घोरपडे हे खाणीतून दगड वाहतुकीचे काम करीत होते. खाणीतून दगड भरून ते बाजूच्या कच्च्या रस्त्याने क्रशरकडे येत होते. डंपर खाणीतून बाहेर पडत असताना एका वळणावर सुमारे साठ फूट उंचीवरून अचानक खाणीत कोसळला. या खाणीत पाच ते सहा फूट पाणी होते. यामध्ये चालक घोरपडे यांचा पाण्यात गुदमरून जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.
दगड खाणीत डंपर पडून चालक ठार
By admin | Updated: September 12, 2016 00:03 IST