अंकलखोप : तळागाळातील समाजाला जीवनाची विदारकता व जीवनाची समृध्द लय पूर्वी कधी सापडली नाही. जन्मापासून जे पारध्यांनी भोगले, वंचित समाजाने भोगले, ते साहित्यात अद्यापही नीटपणे आले नाही. परंतु पारधी, कोल्हाटी समाजमने ज्यावेळी लिहिती झाली, त्यावेळी साहित्यसृष्टी खऱ्याअर्थाने समृध्द झाली आहे. त्यांच्या अनोख्या समाजजीवनाचे भावविश्व साहित्यातून दिसून येऊ लागल्यानेच साहित्यविश्वात हे साहित्य वेगळे ठरले आहे, असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक गिरीश प्रभुणे यांनी केले.औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या ७३ व्या साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. तळागाळातील समाजाच्या साहित्यासंदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले, एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये लपलेल्या भूमिका जाणून घेतल्या पाहिजे. भटके विमुक्त, दलित, कोल्हाटी समाज लिहू लागल्याने जीवनातील खऱ्या व्यथा-वेदनांचे चित्रण साहित्यात उमटू लागले. ज्याच्याकडून जगण्याचा सराव केला जातो, तोच देशाच्या वैभवात भर घालत असतो. डोंबारी, पारधी, कोल्हाटी समाजामध्ये दररोज रामायण घडत असते. त्याचा मराठी साहित्यात प्रवेश होऊ लागला आहे. वंचित समाजाचे मरण, जगणे हे साहित्यात उमटू लागले आहे आणि हेच जीवनानुभव भविष्यातील साहित्याची पंढरी होणार आहे. हा समाज इतर समाजाबरोबर वावरू लागला आहे, हीच साहित्याची खरी देण असल्याचेही त्यांनी सांगितले.साहित्य संमेलनप्रसंगी सदानंद सामंत, कवी सुधांशू, म. भा. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सदानंद साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी केले. यावेळी केंद्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल भिलवडीचे मुख्याध्यापक डी. के. किणीकर यांचा गौरव करण्यात आला. सरपंच संजना यादव यांचाही गौरव करण्यात आला.यावेळी कवी सुधांशू व्यासपीठावर अण्णासाहेब डांगे, वसंत केशव पाटील, मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, कविसंमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुनंदा शेळके, कवयित्री वैशाली पाटील, सरपंच संजना यादव, प्रा. द. तु. पाटील (बेळगाव), कवी सुभाष कवडे, वैजनाथ महाजन, उद्योगपती काकासाहेब चितळे, बाळासाहेब पवार, रवी पाटील, बापूसाहेब शिरगावकर, श्वेता बिरनाळे, उपसरपंच महेश चौगुले आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले. (वार्ताहर)पुढील वर्षीपासून पुरस्कारपुढील वर्षीपासून साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट साहित्यकृतीला साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले.प्रा. दिलीपकुमार मोहिते, यांच्या ‘डोहाळे जेवण’ या कथासंग्रहाचे, पी. डी. सागावकर यांच्या ‘कविता मनातल्या’ या कवितासंग्रहाचे व राजा रावळ यांच्या ‘राजलक्ष्मी’ या विशेषांकाचे प्रकाशन केले.
उपेक्षित समाजमने लिहिती झाल्याने उत्तम साहित्य निर्मिती
By admin | Updated: January 16, 2016 00:29 IST