विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : पावसाचे आगार असणाऱ्या शिराळा तालुक्यात वारणा व मोरणा नदीला आलेल्या पुराने मोठे नुकसान झाले, पण संकटांचा सामना करणाऱ्या शिराळकरांनी नव्या उमदीने जनजीवन पूर्वपदावर आणले आहे. शेती, घरे, दुकाने पाण्यात गेली; तरी माणसाची जगण्यासाठी लढण्याची ऊर्मी उल्लेखनीय आहे. पुरात ८० कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले असले तरी यातून सावरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
जुलैमध्ये पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडला. नदी, नाले, ओढे पात्राबाहेर पडले. यामुळे शेती पाण्याखाली गेली. गावामध्ये पाणी शिरल्यामुळे घरे, व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. ६२०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पुरामुळे देववाडीचे पूर्ण स्थलांतर केले होते, तर सागाव, चिखली, चरण, आरळा, शेडगेवाडी आदी नदीकाठावरील गावांतील १४७४ नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. १० जनावरांचा मृत्यू झाला आहे. १९१ दुकानांत पाणी गेले, तसेच ९०५ अंशतः तर ९५ पूर्णतः घरांचे नुकसान झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चार पुलांचे, रस्त्यांचे २१ कोटी रुपयांचे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे पाच पुलाचे, ३० किलोमीटर रस्त्यांचे ११ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीचे ६०० लघु दाब वाहिनीचे खांब, ४०० उच्च दाब वाहिनीचे खांब पडले. २०० डीपी, तसेच पणुंब्रे येथील उपकेंद्र पाण्यात गेले होते. अनेक ठिकाणी तारा तुटल्या होत्या. यामध्ये १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोकणेवाडी, भाष्टेवाडी या डोंगर पायथ्याशी असणाऱ्या येथील २४६ नागरिक, तसेच जनावरांचे स्थलांतर केले होते.
पूर ओसरल्यानंतर विविध गावांमध्ये ग्रामपंचायती, स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांनी स्वच्छतेच्या कामांना गती दिली. पंचनाम्यांची कामे सुरू झाली आहेत. पूरकाळात काही संस्था व दानशूर नागरिकांनी मदतीचा हात देऊन माणुसकीची ऊब कायम असल्याचे दाखवून दिले.
चाैकट
कोरोनाच्या छायेत पुराशी सामना
तालुक्यात कोरोनाचे संकट कायम असताना पुराचा विळखा अनेक गावांना पडला. यामुळे अनेकांना घराबाहेर पडावे लागले. कोरोनाचा छायेत वावरत नागरिकांनी पुराचाही सामना केला. एकावेळी दोन्ही संकटांना तोंड देत शासकीय यंत्रणेनेही चोख भूमिका बजावली.