अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचे एक संचालक इच्छुक होते. या पाच जणांच्या दबावतंत्रामुळेच उपाध्यक्षपद हुकल्याची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात आहे. राष्ट्रवादीच्या चौघांनी जयंत पाटील यांच्याकडे मोर्चेबांधणी केली, परंतु त्यांच्यात ताळमेळ नसल्याचे दिसून आले.
वाळवा तालुक्यातील संजय पाटील (इस्लामपूर), संभाजी पाटील (नेर्ले), लिंबाजी पाटील (तांबवे), जयश्री पाटील (बहे) उपाध्यक्षपदाचे दावेदार होते. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोणाचीही शिफारस केली नसल्याचे समजते. कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील (बोरगाव) पूर्वीपासून उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते; परंतु वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या संचालकांचे बळ जास्त असल्याने त्यांना संधी मिळणे दुरापास्त होते. त्यातच राष्ट्रवादीतच इच्छुकांनी एकमेकांवर कुरघोड्या केल्याने ही संधी हुकली.
नेर्ले-तांबवे गट भक्कम असूनही उपाध्यक्षपदासाठी इच्छुक लिंबाजी पाटील आणि संभाजी पाटील यांच्या पदरी निराशा आली आहे. पहिल्यापासून या पदाचे दावेदार संजय पाटील यांनाही पाऊल मागे घ्यावे लागले. बहे येथील जयश्री पाटील यांनी थेट जयंत पाटील यांना साकडे घातले होते. मात्र या चारही संचालकांत एकमत नसल्याने वाळवा तालुक्याची संधी हुकली आहे.
चौकट
दुसऱ्या सत्रात वाळव्याला संधी?
पहिल्या सत्रात वाळवा तालुक्याला संधी देऊन दुसऱ्या सत्रात कराड तालुक्याला उपाध्यक्षपद देतील, अशी चर्चा होती. परंतु दक्षिण कऱ्हाडमधील भाजप भक्कम करण्यासाठी पहिली अडीच वर्षे कऱ्हाड तालुक्यातील जगदीश जगताप यांना, तर दुसऱ्या सत्रात वाळवा तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.