वाळवा : वाळवा येथील किराणा दुकानदार कृष्णा जंगम यांच्यावरील कारवाई नियमानुसारच केली आहे. मात्र आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी जंगम यांचे दिलेल्या खोट्या माहितीवरून व राजकीय दबावानेच सरपंच गौरव नायकवडी, ग्रा. पं. सदस्य पोपट अहिर, पोपट मदने, धनाजी मुळीक व कर्मचारी यांचेवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी पोलीस प्रमुख दिलीप सावंत यांनी करून हे गुन्हे रद्दबातल करावेत आणि पोमण यांना निलंबित करावे, अन्यथा आष्टा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रा. पं. सदस्य नजीर वलांडकर यांनी दिला. ते वाळवा ग्रामपंचायतीच्या सभागृहात बोलत होते. वलांडकर म्हणाले की, २००९ पासून २०१४ पर्यंत कृष्णा जंगम यांना, ज्या गाळ्यात दुकान थाटले आहे, त्याच्या भाडेपट्टा वसुलीसाठी नोटिसा दिल्या आहेत. त्या त्यांनी स्वीकारल्या नाहीत. मुळात हा गाळाच कृष्णा जंगम यांचा नसून तो गाळा सी. डी. पाटील यांचा आहे. भाडेपट्ट्याचे नूतनीकरणही त्यांनी केलेले नाही. जंगम यांनी वाळव्यातील अनेकांना माहितीच्या अधिकाराचा धाक दाखवून वेठीस धरले आहे. त्याने ग्रा. पं. दफ्तर तपासणीची मागणी केली होती. त्यातही त्याला काही निष्पन्न झाले नाही. ग्रा. पं.ने भाडेपट्टा भरणेची विनंती केली, नोटीस दिली. कर्मचार्यांना पाठवून भाडेपट्टा वसुलीबाबत सहकार्य करण्याची मागणी केली. परंतु जंगम यांनी त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच ग्रा. पं. ला त्याच्यावर नियमानुसारच कारवाई करावी लागली. सरपंच गौरव नायकवडी यांच्यावर निरीक्षक पोमण यांनी राजकीय दबावापोटी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. स्वत: वाळवा-इस्लामपूरचे बीडीओ यांनी सुद्धा पोलीस निरीक्षक आष्टा यांना भ्रमणध्वनीवरून ग्रामपंचायत वाळवा यांनी कारवाई नियमानुसार केली आहे, असे सांगून पोलीस निरीक्षक यांनी हा गुन्हा राजकीय दबावानेच केल्याचे सिद्ध होत आहे. तेव्हा ताबडतोब हे गुन्हे काढून घ्यावेत, अन्यथा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला अहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य पोपट अहिर, पोपट मदने, राजेंद्र मुळीक, संजय अहिर, उमेश घोरपडे, नंदू पाटील, सावकर कदम, राजेंद्र चव्हाण, संजय खोत, शिवाजी सापकर, मोहन सव्वाशे उपस्थित होते. (वार्ताहर)
गौरव नायकवडींवर राजकीय दबावामुळेच गुन्हा
By admin | Updated: May 26, 2014 01:18 IST