सांगली : माधवनगर (ता. मिरज) मिरज येथे रेल्वे रुळाकडेला ठेवलेले जळण पेटल्याने जळणासह परिसरातील काटेरी झुडुपांना भीषण आग लागली. ही आग सुरू असतानाच सांगलीला इंधन वाहतूक करणारी रेल्वे येत होती. चालकाने रूळाकडेला लागलेली आग पाहून प्रसंगावधान ओळखून रेल्वे फाटकाच्या अलीकडेच थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. आज, गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. माधवनगरचे रेल्वे स्थानक गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत आहे. स्थानकाच्या इमारतीची मोडतोड झाली आहे. रेल्वेचा एकही कर्मचारी नसतो. रेल्वे फाटकापासून ते स्थानक परिसरात काटेरी झुडुपांचे साम्राज्य वाढले आहे. परिसरातील महिला व पुरुष दिवसभर काटेरी झुडपे तोडून ते जळणासाठी नेतात. गुरुवारी दुपारी काही महिलांनी तोडलेले जळण रेल्वे रुळाकडेला रचून ठेवले होते. या जळणाने अचानक पेट घेतला होता. याची कुणालाही माहिती नव्हती. रेल्वे फाटकातील गेटमनलाही माहिती समजली नाही. सायंकाळी सांगलीला इंधनने भरलेली रेल्वे येत होती. चालकास रुळाकडेला लागलेली आग निदर्शनास आली. यामुळे त्याने रेल्वे माधवनगर-कर्नाळ मार्गावरील फाटकाच्या अलीकडेच थांबविली. चालकाने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर कर्मचारी दाखल झाले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. त्यानंतर रेल्वे पुढे सांगलीला रवाना झाली. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे पुढील अनर्थ टळला. (प्रतिनिधी)
रूळाजवळ जळण पेटल्याने इंधन वाहतूक रेल्वे थांबविली
By admin | Updated: March 27, 2015 00:53 IST