दुधगाव : मिरज तालुक्यातील दुधगाव येथे सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी प्रकल्प मंजूर करून त्यास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दुधगावसाठी वारणा नदीवरून स्वतंत्र नळ पाणी योजना आहे. दररोज सहा लाख ८० हजार लिटर पाणीपुरवठा होतो. २० टक्के पाणी पिण्यासाठी वापरले गेल्यास सुमारे ८० टक्के पाण्याचे सांडपाणी तयार होते. गावातील बांधीव गटारीतून नैसर्गिक उताराने हे सर्व सांडपाणी दुधगाव-सावळवाडी रस्त्यालगतच्या दत्त मंदिराजवळ एकत्र येते. तेथून पुढे १०० मीटर रुंदीने पसरून सुमारे दोन किलोमीटर अंंतरावरील वारणा नदीत येऊन मिसळते.
या सांडपाण्यामुळे सुमारे दहा एकर क्षेत्र बाधित झाले आहे. निव्वळ पाणगवत उगवून दलदल निर्माण झाली आहे.
याशिवाय स्मशानभूमीकडे जाणारा नदीवरील बंधारा व नवीन पुलाकडे जाणार रस्ता अरुंद बनला आहे. परिणामी रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या सांडपाण्यासाठी अंतिम प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाल्यास केवळ एक एकर जागेत प्रकल्प उभारता येईल. उर्वरित जमीन इतर कारणांसाठी वापरता येईल. नदीत मिसळणारे दूषित पाणी बंद होऊन वारणा नदीचे प्रदूषण थांबेल. या सर्व बाबीचा विचार करून सांडपाणी प्रकल्प उभारावा, अशी मागणी होत आहे.
चौकाट
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
या सांडपाणी प्रकल्पासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी निधी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.