लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील कोल्हापूर रस्त्यावर पायी चालत घरी निघालेले राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मोटारीच्या चालकास येथील न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
श्यामराव आनंदराव जगताप (५०, रा. शास्त्रीनगर, इस्लामपूर) असे अटकेत असलेल्या चालकाचे नाव आहे. हा अपघात सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास झाला होता. त्यानंतर पळून जाताना जगताप याला वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव यांनी पाठलाग करून पकडले होते.
जगताप याला मंगळवारी पोलिसांनी येथील न्यायालयासमोर उभे केले होते. जगताप याने मद्यपान केले होते का? याचा अहवाल यायचा आहे. तसेच या अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी सरकार पक्षाने पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने जगताप याला दोन दिवसांची कोठडी दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.