सांगली : महापालिका क्षेत्रातील ६० पूरग्रस्त कुटुंबांच्या घरकुलाचा प्रस्ताव म्हाडा कार्यालयाने मंजूर केला आहे. या कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याची माहिती महापालिका क्षेत्र प्रधानमंत्री आवास योजना समितीचे अध्यक्ष नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी सोमवारी दिली.
ठोकळे म्हणाले, २०१९ च्या महापुराने बाधित झालेल्या कुटुंबांच्या घरकुल बांधणीचा प्रस्ताव म्हाडा कार्यालय मुंबई येथे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला अखेर यश आले आहे. ६० लाभार्थींच्या घरकुलाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. संबंधित लाभार्थींनी महापालिकेत प्रधानमंत्री आवास योजना समिती कार्यालयात संपर्क साधावा.
घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थीला अडीच लाखांचे अनुदान मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्य शासन हिश्याचे एक लाख रुपये प्राप्त होतील. त्यानंतर केंद्र शासन हिश्याची रक्कम येईल. सततच्या पाठपुराव्यामुळे या लाभार्थींचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असेही ते म्हणाले.
जगन्नाथ ठोकळे म्हणाले, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या नागरिकांनी अनुदान योजनेतून शौचालय बांधलेले आहे, त्यांचे अनुदान अद्याप दिलेले नाही. सुमारे २०० लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना त्यांचे थकीत अनुदान द्यावे. शौचालय अनुदान योजना नव्याने सुरू करावी, अशी मागणी आयुक्त कापडणीस यांच्याकडे केली आहे. कापडणीस यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.