रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांच्याहस्ते नूतन अध्यक्ष डॉ. सुरेश भाेसले यांचा सत्कार करण्यात आला. बाजूस नूतन उपाध्यक्ष जगदीश जगताप व संचालक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. सुरेश भाेसले यांची, तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप (वडगाव-हवेली) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर जयवंतराव भाेसले सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पाडली. त्यांनी अध्यक्षपदी डॉ. सुरेश भाेसले व उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची निवड केल्याचे जाहीर केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी, संजय सुद्रीक, जे. पी. शिंदे उपस्थित होते. अष्टेकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. भाेसले म्हणाले, या निवडणुकीत सभासदांनी इतिहास घडविला आहे. सभासदांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिले असल्याने आता आमची जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव नवीन संचालक मंडळाला आहे. त्यामुळे आता त्यादृष्टीने कारखान्याच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी कार्यरत होत आहोत. येत्या काळात कारखान्याची क्षमता वाढविण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे.
कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भाेसले म्हणाले, सर्व सभासदांना बरोबर घेऊन जाण्याची आणि सर्वांना समान न्याय देण्याची आमची भूमिका असणार आहे. सभासदांना मोफत साखर घरपोच देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची दिवाळीपूर्वीच अंमलबजावणी करून प्रत्येक सभासदाला मोफत साखर घरपोच केली जाईल.
नूतन उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, कराड तालुका साखर कामगार संघाच्यावतीने अध्यक्ष एम. के. कापूरकर व गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्याहस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन संचालक दयानंद पाटील, लिंबाजी पाटील, संभाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, जे. डी. मोरे, शिवाजी पाटील, बाबासाहेब शिंदे, जयश्री पाटील, इंदुमती जाखले, अविनाश खरात उपस्थित होते.
कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी स्वागत केले, रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. नूतन संचालक बाबासाहेब शिंदे यांनी आभार मानले.