सांगली : शासनाने कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असलेतरी त्यामुळे काही व्यावसायिकांना सूट देण्यात आली आहे तर काहींना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून अगोदरच कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा नियमांच्या नावाखाली व्यापाऱ्यांवर अन्याय करू नये, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्याकंडे केली.
सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांनीही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाैधरी यांची भेट घेत आपले निवेदन सादर केले.
शासनाच्या नव्या निर्बंधानुसार वाहतूक, वाईन शॉपसह काही व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. तर काही दुकाने एक महिना बंद राहणार आहेत. अगोदरच कोरोनामुळे व्यावसायिक अडचणीत आहेत. त्यात असा आदेश दिल्यास तो व्यापाऱ्यांना अडचणीचा ठरणार आहे. व्यापाऱ्यांकडून कोरोनाबाबत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. व प्रशासनाला सहकार्यही करण्यात येत असल्याने असे नियम लादू नयेत अन्यथा त्यास तीव्र विरोध करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
यावेळी व्यापारी महासंघाचे अतुल शहा यांच्यासह सतीश साखळकर, महेश खराडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
हाॅटेल व्यावसायिकांचेही गाऱ्हाणे
नवीन निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी हॉटेल चालक मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यात वर्षभरापासून हॉटेल व्यावसायिकांची मोठी अडचण झाली आहे. महापूर, कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आहेत. त्यामुळे रात्री आठनंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हॉटेल व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाला सर्वांचे सहकार्य मिळणार असून पालन न करणाऱ्यांचे हॉटेल कायमस्वरूपी सील करावे, पण व्यवसायास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष शैलेश पवार यांच्यासह सदस्यांनी निवेदन सादर केले.