शिराळा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन कोटी रुपयांच्या इमारत विकासकामाबाबत राजकारण कशाला करता? तुम्ही आमदार असताना पाठपुरावा केला असता तर मागील अर्थसंकल्पात हे काम मंजूर झाले असते. हे काम मी मागणी केल्यानंतर मंजूर झाले आहे, असे आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यावर टीका करताना सांगितले.
आमदार नाईक यांनी सांगितले की, एखादे काम आमदारांनी सुचविले तर ते त्या अर्थसंकल्पात मंजूर होते. माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे काम आपण मंजूर करून आणल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांनी हे काम सुचविले असते तर ते मागील अर्थसंकल्पात मंजूर झाले असते. मात्र हे काम आपण या वर्षात सुचविले होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र देऊन पाठपुरावा करून मंजूर करून घेतले आहे. यामुळे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊन डांगोरा कशाला पिटत आहात, असा टोलाही आमदार नाईक यांनी लगावला.
चौकट
रस्त्यास २२५ कोटी
बहे पुलपाासून तांबवे, धोत्रेवाडी, शेणे, वाटेगाव, टाकवे, शिवरवाडी, शिरशी, वाकुर्डे बुद्रुक हा ४० किलोमीटरचा २२५ कोटी रुपयांचा काँक्रीटीकरण रस्ता मंजूर करण्यात आला आहे. तसेच पुढील वर्षी वाकुर्डे बुद्रुक ते मणदूर हा रस्ता होणार आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी सांगितली.