सांगली : शहरासह विस्तारित भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहेत. नुकतेच अमरधाम स्मशानभूमीत रक्षाविसर्जनासाठी आलेल्या नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात चार ते पाच जणांचा चावा घेतला. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
महापालिका क्षेत्रात २० हजारहून अधिक मोकाट कुत्री आहेत. या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीमही थंडावली आहे. महापालिकेने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करून लसीकरण मोहीम हाती घेतली होती, पण त्यातही अडथळे आले आहेत. अशात शहरात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत आहेत. रात्रीच्यावेळी तर चौका-चौकात कुत्री टोळक्याने फिरत असतात.
अमरधाम स्मशानभूमी परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक आहे. स्मशानभूमीत रक्षा विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांवर कुत्री हल्ला करीत आहेत. नुकतेच चार ते पाच जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला. परिसरातील नागरिकांनी आरोग्य विभागाकडेही तक्रारी केल्या. पण त्याची दखल घेतली नाही. मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा कुत्री अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला आहे.