सदानंद औंधे
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेच्या वैद्यकीय पंढरीतील डॉक्टरांनी जीवतोड मेहनत करून दीड वर्ष कोरोनाचा मुकाबला केला. पण अॅपेक्स केअर रुग्णालयामधील गैरप्रकारामध्ये डाॅक्टरांचे अटकसत्र सुरू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता आहे. कागदोपत्री नियुक्त डॉक्टर आता चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.
सुविधा नसतानाही डॉ. महेश जाधवच्या रुग्णालयाला नियमबाह्य परवानगी देणारी महापालिकाही तितकीच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया आहे.
कोरोना उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर, व्हेंटिलेटर व वैद्यकीय सुविधांची खातरजमा न करताच महापालिकेने परवानगी दिली. जाधवने रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे कागदोपत्रीच दर्शविले होते. या बनवेगिरीमुळे दुसऱ्या लाटेतील दोन महिन्यांत २०५ पैकी ८७ रुग्णांचे जीव गेले. या मृत्यूसत्रानंतरही प्रशासनाने डेथ ऑडिट केले नाही. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाची मोडतोड केल्यानंतर तक्रारींची दखल घेतली.
गुन्हा दाखल झाल्यावर डॉ. जाधवने अटकपूर्व जामीन मिळविला. मात्र, ८ कर्मचाऱ्यांच्या अटकेनंतर त्याचे कारनामे उघड झाले. चौकशीदरम्यान आता रुग्णांची लूटमार करण्यासाठी जाधवला मदत करणाऱ्यांची नावे उघडकीस येत आहेत. महेश जाधव याचा भाऊ डॉ. मदन यांच्या अटकेनंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ॲपेक्स केअरमध्ये अनेक उच्च पदवीधर डॉक्टरांची नेमणूक जाधव याने दाखविली होती. त्याच्या आधारेच रुग्णालयाला परवानगीचा मार्ग सुकर झाला होता. आता पोलिसांनी या कागदोपत्री डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, डॉक्टरांनी या प्रकरणात हात वर केले आहेत.
डॉ. महेश जाधव याने रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर उपचाराची खोटी कागदपत्रे तयार केल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाले आहे. यातून डॉ. जाधवची गुन्हेगारी मानसिकता स्पष्ट होत आहे. आतापर्यंत दहाजणांना अटक झाली असून, रुग्णालयास परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही चाैकशीला सामोरे जावे लागेल.
चाैक
दोन्ही लाटांत १४१ रुग्णांनी प्राण गमावले
ॲपेक्स रुग्णालयात गतवर्षी ५४ व यावर्षी तब्बल ८७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. डॉ. जाधव याचा पैशांचा हव्यास रुग्णांच्या जीवावर बेतल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधींना डॉ. जाधवच्या हव्यासापोटी प्राण गमवावे लागले आहेत.