सांगली : शहरातील गणेशनगरमध्ये वैद्यकीय उपचाराच्या बिलावरून तिघांनी डॉक्टराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी डॉ. संजय बबनराव लवटे (रा. दत्तनगर, सांगली) यांनी परशुराम दराप्पा गोयकर, श्रीकांत शिवाजी गोयकर (दोघेही रा. चैतन्यनगर, सांगली) व एका अनोळखी इसमाविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील गणेशनगर जलतरण तलावाजवळ डॉ. लवटे यांचे साईना क्लिनिक ॲण्ड हेल्थ सेंटर नावाचे रुग्णालय आहे. संशयित परशुराम गोयकर याच्या भावाला कोरोना उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १८ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी गोयकर यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाचे बिल दिले होते. मंगळवार दि. ८ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित रुग्णालयात आले व त्यांनी या बिलात एक हजार रुपये कशाचे जास्त लावले आहेत म्हणत डॉक्टरांना दमदाटी सुरू केली. इतर संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू करत डॉ. लवटे यांच्या अंगावरील पीपीई किटही फाडून टाकले. या गोंधळात रुग्णालयात असलेला ऑक्सिजन सिलिंडरही खाली पडला व त्याचे नुकसान झाल्याचे व तुला बरबाद करून सोडू, अशी धमकी दिल्याचेही लवटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तिघा संशयितांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.