सांगली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने वेग घेतला असून, सोमवारअखेर एकूण ७० हजार ८६२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले, यामध्ये २५ हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
सोमवारी दिवसभरात ५ हजार ३२० ज्येष्ठांनी लस टोचून घेतली, तर ४५ ते ५९ वर्षे वयाच्या ९९२ व्याधीग्रस्तांचे लसीकरण झाले. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यासह एकूण ७ हजार ४८८ जणांनी सोमवारी दिवसभरात लस टोचून घेतली. आजअखेर २५ हजार ८१० ज्येष्ठांनी लस टोचून घेत स्वत:ला कोरोनापासून सुरक्षित ठेवले आहे. ४५ ते ५९ वयाच्या ४ हजार ६०० व्याधीग्रस्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत लस टोचण्याची मोहीम सुरु आहे.
सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालये, महापालिकेची सर्व आरोग्य केंद्र, ग्रामीण भागातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे लस मोफत दिली जात आहे. त्याशिवाय २७ खासगी रुग्णालयांतही २५० रुपये शुल्कात लस टोचली जात आहे.
चौकट
एकही साईड इफेक्ट नाही
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याने लसीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. लस टोचल्यानंतर गंभीर त्रास झाल्याचा एकही प्रकार घडला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.