सांगली : बंद असलेली महाविद्यालये, कार्यक्रम, उत्सव आणि कोरोना लसीकरणामुळे रक्तदानावर असलेले बंधन अशा गोष्टींमुळे जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. केवळ आठवडाभर पुरेल इतकाच रक्तसाठा जिल्ह्यातील रक्तपेढ्यांकडे शिल्लक आहे.
जिल्ह्यात सध्या १८ रक्तपेढ्या आहेत. यातील बहुतांश रक्तपेढ्यांकडील सध्याचा रक्तसाठा आठवडाभर पुरेल इतकाच आहे. कोरोनापूर्वी व कोरोनानंतरच्या परिस्थितीत खूप मोठा फरक पडला आहे. जिल्ह्यात नेहमी उत्सव, वाढदिवसाचे कार्यक्रम, जत्रा, यात्रा यानिमित्त रक्तदान शिबिरे होत होती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडूनही स्वेच्छा रक्तदानाचे प्रमाण अधिक होते. कोरोना काळात या सर्व गोष्टी ठप्प झाल्या. उत्सव, कार्यक्रम बंद झाले. त्यामुळे त्यानिमित्ताने होणारी शिबिरे थांबली. महाविद्यालये बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांकडून नियमितपणे होणारे रक्तदान थांबले आहे. लसीकरणामुळे दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने त्याचाही परिणाम रक्तदान घटण्यावर झाला आहे.
काेरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यातच रक्ताच्या तुटवड्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे. त्यामुळे लोकांनी रक्तदान करण्याची मोठी गरज सध्या निर्माण झाली आहे.
चौकट
शासकीय रक्तपेढीतही टंचाई
सांगली व मिरजेत असणाऱ्या शासकीय रक्तपेढीतही रक्ताचा तुटवडा आहे. सांगलीतील पेढीत केवळ पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. दैनंदिन रक्तसंकलनात ६५ टक्के घट झाल्याचे चित्र आहे. मिरजेच्या रक्तपेढीत १५ दिवस पुरेल एवढा साठा असला तरी त्या ठिकाणी स्वेच्छा रक्तदान थांबले आहे.
सिद्धिविनायक रक्तपेढी
मिरजेतील सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालयातील रक्तपेढीतही आठवडाभराचाच साठा शिल्लक आहे. वर्षभरात सहा ते आठ हजार पिशव्या रक्तसंकलन कोरोनापूर्वी होत होते. ते प्रमाण ६५ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.
शिरगावकर ब्लड बँक
सांगलीतील शिरगावकर ब्लड बँकेत आठवडाभर पुरेल इतकाच साठा आहे. ऐच्छिक रक्तदात्यांचे प्रमाण या ठिकाणी घटले आहे. शिबिरांचा विचार केल्यास यातून होणाऱ्या रक्तसंकलनात ५० टक्के घट झाली आहे.
वसंतदादा ब्लड बँक
केवळ आठ ते दहा दिवस पुरेल इतकाच साठा वसंतदादा ब्लड बँकेत आहे. शिबिरांचे व ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण ५० ते ६० टक्के घटल्याची माहिती बँकेमार्फत देण्यात आली. शिबिर बंद असल्याने मोठा फटका बसला आहे.
लसीकरणापूर्वी करा रक्तदान
जिल्ह्यात सध्या कोरोनाप्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. पहिल्या डोसनंतर २८ दिवस व दुसऱ्या डोसनंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. साधारण दोन महिने संबंधित व्यक्तीला रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लसीकरणापूर्वीच दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.