शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील पारधी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिराळा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी शालेय साहित्याचे वाटप केले. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद जाधव यांनी यासाठी पुढाकार घेतला. कोमल पवार, परी पवार, निर्जला पवार, सघुना पवार, जावेद पवार, आर्यन पवार या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. त्यातच घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने देववाडीतील या मुलांना अनेक अडचणी येत आहेत. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर व विनोद जाधव यांनी या मुलांना शालेय साहित्य देऊन मदत केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक टारझन पवार व आई रोशना पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी पोलीस कर्मचारी अभिजित पवार, दीपक हांडे, नितीन घोरपडे उपस्थित होते.