इस्लामपूर येथे दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डॉ. संजय साळुंखे, डॉ. संजय पाटील, डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. राणोजी शिंदे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पहिले अपंगत्व तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर शनिवारी झाले. या शिबिरामध्ये वाळवा व शिराळा तालुक्यांतून नोंद केलेल्या २३२ रुग्णांपैकी चार विभागांतील प्रत्येकी १० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील नऊ अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी उपजिल्हा रुग्णालय येथे शिबिर होणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून हा कक्ष सुरू करण्यात आला आहे.
वाळवा तालुक्यातून ११३ अस्थि रुग्ण, ३३ नेत्र रुग्ण, २८ मतिमंद रुग्ण, तर शिराळा तालुक्यातून २९ अस्थी रुग्ण, १६ नेत्र रुग्ण व १३ मतिमंद रुग्ण तसेच दोन्ही तालुक्यांतून काही रक्तासंबंधी आजार असणाऱ्या रुग्णांनी नोंद केली.
राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या हस्ते अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, शहाजी पाटील, संग्राम पाटील, रोझा किणीकर, सचिन कोळी, प्रकाश पवार उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणोजी शिंदे, डॉ. अशोक शेंडे, डॉ. दीपाली लादे, डॉ. सचिन भंडारी, डॉ. दीप्ती जोशी, डॉ. राहुल कुंडले, नाना सावंत, इलियास पिरजादे, राजाराम जाधव यांनी हे शिबिर यशस्वी केले.