मिरज : जिल्हा प्रशासनाने येथील डेडिकेटेड कोविड केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे, त्यामुळे रुग्णसेवेचा ताण शासकीय रुग्णालयातील प्रशासनावर पडला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त्या देण्याची मागणी गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा हेटकाळे यांच्यासह परिचारिकांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालयातील जुन्या पॅथॉलॉजी विभागात डेडिकेटेड कोविड सेंटर सुरु केले होते. तेथे कंत्राटी डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ आदी ६१ जण कार्यरत होते. ३१ ऑगस्टपासून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यामुळे तेथील ५४ रुग्णांची जबाबदारी शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर येऊन पडली आहे. रुग्णालयात अजूनही मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. सात अतिदक्षता विभागात १३५ रुग्ण आहेत. एकूण १० वॉर्डमध्ये २६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या स्थितीत डेडिकेटेड केंद्रातील रुग्णांवर उपचारांसाठी वेळ देता येणार नाही. रुग्णालय प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात काही कर्मचारी डेडिकेडेट केंद्रात नियुक्त केले असले तरी त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर ताण पडत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून निधी मिळणे बंद झाले आहे. त्यांना कार्यमुक्त करण्याचे शासनानेच आदेश आहेत. त्यामुळेच त्यांना कमी करण्यात आले. शासनाकडून आदेश आल्यास पुन्हा नियुक्त्या दिल्या जातील.
निवेदन देण्यासाठी विवेक कुरणे, वरुण सत्याचारी, सारिका घवाळी आदी उपस्थित होेते.
चौकट
शारीरिक स्वास्थ्य हरविले
परिचारिकांनी सांगितले की, कामाच्या ताणामुळे परिचारिकांचे मानसिक व शारीरिक संतुलन ढासळले आहे. गेल्या दीड वर्षांत सुट्ट्यादेखील मिळालेल्या नाहीत. हे लक्षात घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त्या द्याव्यात.