सांगली : भाजपच्या ग्रामीण विभागाची व्हर्च्युअल बैठक पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडली. जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेताना बुथरचना अधिक मजबूत करण्याची सूचना देशपांडे यांनी दिली.
बैठकीत पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, गतवेळी बुथरचनेमध्ये महाराष्ट्रात सांगली जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे बुथरचनेसाठी ज्या-ज्या बाबींची आवश्यकता असेल, त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू. बुथरचनेसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व मंडलांमध्ये आगामी काळात प्रत्यक्ष दौरे केले जातील. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार मंडल अध्यक्षांकडून मंडल कार्यकारिणी, मोर्चाची कार्यकारिणी ताबडतोब तयार करून नियुक्त नवीन पदाधिकारी यांना जबाबदाऱ्या देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
बैठकीस आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार रमेश शेंडगे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, रवी अनासपुरे, योगेश बाचल आदी उपस्थित होते.