सांगली : मुद्रांक शुल्क सवलतीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत असल्याने डिसेंबर २०२० पूर्वी मुद्रांक शुल्क भरुन दिलेल्या दस्तांची नोंदणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम वेळेत व गतीने पूर्ण व्हावे म्हणू सुटी दिवशीही कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी एस. एन. दुतोंडे यांनी दिली.
यासंदर्भातील पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्कची सवलत ३१ मार्च २०२१ पर्यंत आहे, तसेच ३१ डिसेंबर २०२० पूर्वी मुद्रांक शुल्क भरून निष्पादीत केलेले दस्तऐवज नोंदणी करण्यात येत आहेत. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील या कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग दोन, दुय्यम
निबंधक श्रेणी एक ही कार्यालये शनिवार, २० मार्च व २७ मार्च या शासकीय सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. त्याठिकाणी दस्त नोंदणीचे कामकाज सुरू राहील.