महाराष्ट्रातील महिला अत्याचारप्रश्नी शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल शासनाने ठोस व तातडीची कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
यावेळी परिषदेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. पुणे, साकीनाका, जालना, नागपूर, परभणी, पालघर, नांदेड, डोंबिवली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला काळिमा फासणाऱ्या आहेत. राज्य सरकार महाराष्ट्रात महिला अत्याचाराविरुद्ध कुठलीही भक्कम कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. या घटनांबाबत गांभीर्याने लक्ष न देता कुंभकर्णाप्रमाणे हे सरकार झोपी गेलेले आहे की काय? असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी परिषदेच्या वतीने ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा संयोजक ऋषिकेश पोतदार, विशाल जोशी, ऋषिकेश पोतदार, दर्शन मुंदडा, बागेश्री उपळाविकर, अनुश्री विसपुते, तन्वी खाडीलकर, सूरज मालगावे आदींची उपस्थिती होती.