लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडण्याबरोबरच त्यांना सर्व सोयीसुविधा आणि मुलांचे शैक्षणिक प्रश्न सोडण्यासाठी आगामी काळात सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगून राज्यातील धनगर समाजाला न्याय व त्यांचे हक्क देण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची ताकद घेऊन धनगर समाजाच्या पाठीशी भक्कम उभा केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व धनगर समाजाचे नेते बाळासाहेब (मामा) बंडगर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी युवा नेते पार्थ पवार, उद्योजक विनायक मासाळ, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजू जानकर, प्रदेश सचिव प्रा. नारायण खरजे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी सरचिटणीस राजू जानकर यांनी धनगर समाजाच्या विविध प्रश्नांची माहिती देऊन ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यांवर स्थायिक झालेल्या धनगर समाजाला तसेच त्यांच्या मुलांना शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, त्याचबरोबर मेंढपाळांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सरकारने प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.
त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनगर समाजाच्या काहीही अडीअडचणी असतील तर त्या प्राधान्याने सोडविण्याबरोबच त्यांना सोयी-सुविधा दिल्या जातील, मेंढपाळांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री पवार यांचा घोंगडी देऊन सत्कार केला. यावेळी युवा नेते जगन्नाथ जानकर, राजूभाऊ अर्जुन, मदनभाऊ कातुरे, डॉ. रवींद्र नाळे, आनंद ढवळे, प्रदीप कोळेकर, रियाज शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.