लोकमत न्यूज नेटवर्क
जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील अप्पासाहेब रामचंद्र काटकर व सुखदेव तातोबा काटकर या शेतकऱ्यांच्या घरासमोरील चार गंजींना आग लागून एक लाख १६ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत ७७५० पेंढ्या वैरण जळून खाक झाली आहे. नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही.
वाळेखिंडी ते डोंगरगाव (ता. सांगोला) रस्त्याच्या दरम्यान वाळेखिंडीपासून सुमारे अडीच किलोमीटरवर काटकर वस्ती आहे. अप्पासाहेब काटकर यांच्या दोन गंजींत ४५०० तर सुखदेव काटकर यांच्या दोन गंजींत ३२५० पेंढ्या वैरण होती. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घरातील सर्वजण घरासमोरील शेतात काम करत असताना अचानक गंजीला आग लागली. त्यावेळी घरात पाठीमागे थांबलेल्या वयोवृद्ध नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. माजी सरपंच तानाजी शिंदे यांनी वीज वितरण कंपनीला फोन करून खंडित असलेला वीजपुरवठा सुरू करण्याची सूचना केली. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर विद्युत मोटार सुरू करून आग लागलेल्या गंजीवर पाणी मारण्याचा प्रयत्न केला; परंतु वैरण वाळली असल्यामुळे व वारे सुरू असल्यामुळे क्षणार्धात संपूर्ण वैरण जळून खाक झाली आहे. या आगीत अप्पासाहेब काटकर यांचे ६७ हजार ५०० रुपये तर सुखदेव काटकर यांचे ४८ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे.
विजय शिंदे, रघुनाथ काटकर, ज्योती काटकर, अजय शिंदे, प्रवीण काटकर यांनी तानाजी शिंदे यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.