लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मेढा (जि. सातारा) पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुपवाड येथील चौघांच्या खुनाचा कौशल्याने तपास करीत आरोपीला अटक केल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांना केंद्रीय गृहमंत्री गौरव पदक जाहीर करण्यात आले आहे. कोणतेही धागेदोरे हाती नसताना, अत्यंत गुंतागुंतीचा तपास करीत टिके यांनी आरोपीस गजाआड केले होते.
कुपवाड येथील तुषार तानाजी जाधव, विशाल तानाजी जाधव, तानाजी विठोबा जाधव आणि मंदाकिनी तानाजी जाधव या चौघांचा खून करून त्याचा पुरावा नाहीसा करण्यात आला होता.
सांगली शहर उपअधीक्षक असलेले टिके यापूर्वी वाई येथे उपअधीक्षक येथे कार्यरत होते. ११ ऑगस्ट २०२० रोजी मालदेव खिंड ते भिलार या मार्गावरील घाटातील दरीत अंगावर जखमा असलेला मृतदेह मिळाला होता. याचा तपास करीत असतानाच, २९ ऑगस्ट रोजी मालदेव घाटामध्ये एका महिलेचाही मृतदेह मिळून आला. याचा तपास करताना योगेश मधुकर निकम याने तुषार व विशाल या दोघांना भरती करण्यासाठी दीड लाख रुपये घेतले होते. त्या दोघांना जेवणातून विष देऊन मारून मृतदेह दरीत टाकले हाेते. यानंतर तुषार व विशाल यांच्या आई-वडिलांनाही बोलावून घेत त्यांनाही निकम याने मारून दरीत टाकले होते.
कोणताही पुरावा नसताना उपअधीक्षक टिके यांनी या खून प्रकरणाचा तपास केला होता. गुंतातागुंतीच्या असलेल्या चौघांच्या खूनप्रकरणाचा छडा लावीत आरोपीला अटक केल्याबद्दल टिके यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले.