लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर उद्या शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. राज्यात सर्वप्रथम कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्याची प्रभावी कामगिरी त्यांनी केली होती.
मूळचे बारामती येथील आगवणे यांची १९९५ मध्ये एमपीएसीमधून तहसीलदार म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली. ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत त्यांनी काम केले. आगवणे कोल्हापूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी असताना शंभर टक्के केरोसिनमुक्त झालेले शहर म्हणून कोल्हापूरला बहुमान मिळाला.
सांगलीत रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामांचे नियाेजन करत सरासरी मजूर उपस्थितीमध्ये सांगली जिल्हा पुणे विभागात अग्रेसर राहिला होता.
सांगलीत जिल्हास्तरीय भूसंपादनाचे काम पाहताना सिंचन प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यासाठी त्यांनी नियोजन केले होते.