सांगली : होमआयसोलेशनमधील रुग्ण घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सांगलीवाडी येथील दोघेजण नियमांचे उल्लंघन करून बाहेर फिरत असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने तातडीने धाव घेत दोघांची कोविड केअर सेंटरला रवानगी केली.
महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह वैद्यकीय पथकाकडून होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू आहे. शहरात दीड हजारांहून अधिक कोविड रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे.
सांगलीवाडी परिसरातील कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आणि होमआयसोलेशनमध्ये असलेली एक व्यक्ती असे दोघेजण रस्त्यावर फिरत असल्याची माहिती महापालिकेच्या पथकाला मिळाली. या पथकाने पोलिसांना सोबतीला घेत सांगलीवाडी गाठली. त्या रुग्णांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन महापालिकेच्या मिरज येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले.
ही कारवाई समन्वक ए. पी. मगदूम, लिपिक प्रसन्न भोसले, डॉ. मानसी घोडके, स्वच्छता निरीक्षक किशोर कांबळे आदींनी केली.