सांगली : गेल्या पाच वर्षांत महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे ३०० ते ४०० रुग्ण सापडत आहेत. यंदा कोरोनाच्या काळातही डेंग्यू रुग्णांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून येते. पावसाळा संपल्यानंतर डेंग्यू रुग्ण संख्येत मोठी वाढ होते. डेंग्यूसोबतच चिकुनगुन्याचे प्रमाणही वाढले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळोवेळी डेंग्यू, चिकुनगुन्याची साथ आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत; पण नागरिकांकडून अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे नागरिकांचे जनजीवनच प्रभावित झाले आहे. सध्या कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे. त्यात कोरोनाच्या काळात अवकाळी पावसानेही संपूर्ण जिल्ह्याला झोडपले होते. नोव्हेंबर महिन्यापर्यंत अधूनमधून पाऊस पडत होता. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून डेंग्यूसदृश डासांचे प्रमाणही वाढले. परिणामी २०१८ ते २०१९ तुलनेत २०२० मध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली होती. सध्या महापालिका क्षेत्रात दरमहा २५ ते ३० रुग्ण आढळत आहेत.
चौकट
महापालिकेकडून सर्व्हे
कोरोनापूर्वी डेंग्यू, चिकुनगुन्या, हिवताप या साथी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेकडून घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत होते. पण कोरोनाच्या काळात महापालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा साथ आटोक्यात आणण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत होती. त्यामुळे महापालिकेने २० प्रभागांसाठी २५ जणांचे स्वतंत्र पथक तयार केले. या कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन गृहभेटी देऊन कंटेनरचे सर्वेक्षण, डास अळींचा शोध, डासोत्पती स्थानांची गणना, नागरिकांना आरोग्य शिक्षण, अळीनाशकाची फवारणी, गप्पी मासे सोडणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांकडून कंटेनर रिकामे करून घेण्याचे कामही केले जाते.
चौकट
डेंग्यूची लक्षणे
१. एकदम जोराचा ताप येणे. डोळ्याच्या वरच्या भागात वेदना होणे. डोक्याच्या पुढील भागात दुखणे.
२. डोळ्यात जळजळ होणे, स्नायू, सांध्यात दुखणे, शरीरावर पुरळ उठणे
३. त्वचेचा रंग फिकट होणे, झोप न लागणे, अस्वस्थता वाटणे
४. चव व भू्क नष्ट होणे, कितीही पाणी पिले तरी भूक लागत नाही.
५. डेंग्यूची लागणे झाल्यास श्वास घेण्यास त्रास होणे.
चौकट
कुठल्या वर्षात किती रुग्ण
२०१६ : ६५०
२०१७ : ३७५
२०१८ : ३६८
२०१९ : ३१६
२०२० : ४१२