सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची संकल्पना दिली असून, सर्वसामान्यांनी लोकशाहीची जोपासना करणे गरजेचे असल्याचे मत एसटी कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते बिराज साळुंखे यांनी आज (बुधवारी) व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने संविधानाचा गौरव करण्यासाठी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. दिंडीत सजविलेल्या पालखीत भारतीय संविधान, महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय आणि डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांची छायाचित्रे ठेवण्यात आली होती. टाळ, मृदंगाच्या निनादात मारुती चौक, हरभट रोड मार्गे स्टेशन चौक येथे दिंडी आली. यामध्ये न्यू हायस्कूलचे विद्यार्थी तसेच नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बिराज साळुंखे म्हणाले की, लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला भाषण आणि मुद्रण स्वातंत्र्याची देणगी मिळालेली आहे. त्यामुळेच आपल्या मनातील विचार आपण इतरांसमोर प्रभावीपणे मांडू शकतो. लोकशाहीमुळेच आपल्याला मतदानाचा पवित्र अधिकार प्राप्त झाला आहे. त्याद्वारे राज्यकर्ते जर राज्यकारभार नीट करीत नसतील, तर त्यांना सत्तेवरुन पायउतार करण्याची क्षमताही नागरिकांना मिळालेली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. सुभाष पाटील, अॅड. के. डी. शिंदे, राजेंद्र माळी, महेश वाघमारे, संजय कोमटवार, दत्तात्रय घाटगे, सचिन आवळे, सुनील होवाळ, स्नेहल जिरगे, जमीर जमादार, नामदेव कोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लोकशाहीची जोपासना करणे आवश्यक
By admin | Updated: November 27, 2014 00:11 IST