वाळवा : येथील माळभाग परिसरातील व कारखाना रोड, बाराबिगा येथे सोमवारी (दि. २२) ४० हून अधिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा थकीत वीज बिलासाठी तोडण्यात आला आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी करीत महाडिक युवाशक्ती वाळवा आणि ग्रामस्थांच्या वतीने वाळवा येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रसाद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, वाळवा शहराची लोकसंख्या ४० हजारांपर्यंत आहे. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनता व वीज ग्राहक भरडून निघाला आहे. अद्यापही परिस्थितीत सुधारणा नाही. त्यामुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांकडून वीज कनेक्शन तोडत आहेत, हा अन्याय आहे. तरी अधिकाऱ्यांनी या सर्व बाबी लक्षात घेऊन वीज ग्राहकांवर होणारा अन्याय थांबवावा अन्यथा सर्व वीज ग्राहक ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील.