ओळी : महापुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महापालिकेला आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. यावेळी मंत्री जयंत पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उमेश पाटील, मैनुद्दीन बागवान, संजय बजाज उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील रस्ते, ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा वाहिन्यांसह २० इमारती महापुराच्या पाण्याने बाधित झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्ती आणि अन्य उपाययोजनांसाठी ९० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी दिली.
महापौर सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादीचे शहर जिल्ह्याध्यक्ष संजय बजाज यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले. महापौर सूर्यवंशी म्हणाले, महापुराच्या पाण्यामुळे सांगली व मिरज शहरातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. ड्रेनेज व पाणीपुरवठा वाहिन्यांचे नुकसान झालेले आहे. त्यांचीही तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या २० इमारतींमध्ये पाणी शिरले होते. या इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ ९० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. त्याला उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
चौकट :
इतर उपाययोजनांसाठी ४८० कोटींचा प्रस्ताव
पूरस्थितीवर मात करण्यासाठी भविष्यकालीन उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यासाठी ४८० कोटी ७५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्तावही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याचे सूर्यवंशी म्हणाले.
---------
चौकट :
असा आहे प्रस्ताव
रस्ते दुरुस्ती : ७७ कोटी
ड्रेनेज लाइन दुरुस्ती : ०५ कोटी
पाणीलाइन दुरुस्ती : १.५० कोटी
जॅकवेल वर घेणे : ०५ कोटी
इमारती दुरुस्ती : २.५० कोटी