सांगली : सांगली शहराला इतर शहरांशी जोडण्यासाठी सांगली रेल्वे स्थानकातून नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिक जागृती मंचच्यावतीने महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंचचे सतीश साखळकर यांनी हे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, आशिया खंडातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ असल्यामुळे सांगलीला हळदीचे शहर म्हणून ओळखले जाते. सांगलीत पश्चिम महाराष्ट्राची सर्वात मोठी गूळ, द्राक्षे, बेदाणा, सोयाबीन, मका यांची बाजारपेठ आहे. सांगली मार्केट यार्ड हे सांगली रेल्वे स्थानकाजवळच आहे. एक मोठे व्यावसायिक, औद्योगिक आणि शिक्षण केंद्र म्हणूनही सांगलीची ओळख आहे. सांगली रेल्वे स्थानकातून रेल्वे गाड्या सुरू होणे शहराच्या भविष्यासाठी आवश्यक आहे.
त्यामुळे सांगली-सोलापूर एक्स्प्रेस, सांगली-नांदेड एक्स्प्रेस, सांगली-बेळगाव एक्स्प्रेस या गाड्या सुरू करण्यात याव्यात. बेंगळुरू-बेळगाव एक्स्प्रेस गाडी बेळगाव येथे १४ तास थांबून राहते. या वेळेत बेळगाव-सांगली अशी फेरी सोडावी. सांगली-गुलबर्गा एक्स्प्रेस ही मिरज, सोलापूरमार्गे करावी, सांगली-कोल्हापूर मार्गावर दररोज ३ लोकल ट्रेन सुरू कराव्यात, सांगली-पंढरपूर मार्गावर दररोज सकाळी व सायंकाळी लोकल ट्रेन सुरू करावी.
नव्या गाड्या सुरू करताना काही गाड्या सांगली रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित कराव्यात. कुर्डुवाडी-मिरज डेमू प्रवासी गाडी, परळी वैजनाथ-मिरज एक्स्प्रेस, बेळगाव-मिरज पॅसेंजर ट्रेन, लोंढा-मिरज पॅसेंजर ट्रेन, कॅसलरॉक-मिरज पॅसेंजर ट्रेन, कोल्हापूर-मिरज डेमू ट्रेन या गाड्यांसाठी विश्रामबाग स्टेशनवर थांबा करावा, अशी मागणी केली आहे.