सांगलीत पूरग्रस्तांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अप्पर तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन केले. आमदार सुधीर गाडगीळ, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह नेते व पूरग्रस्त सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पूरग्रस्त कुटुंबे व शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाईसाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. राजवाडा परिसरात अप्पर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
आंदोलकांनी सांगितले की, पुराचे पंचनामे वस्तुस्थितीनुसार होत नाहीत. विविध कागदपत्रांची मागणी करीत भरपाईपासून वंचित ठेवले जात आहे. भरपाईचे निकष स्पष्ट नसल्याने मदतीमध्ये दिरंगाई होत आहे.
आंदोलनात नेतेमंडळींसह पूरग्रस्त नागरिकही सहभागी होते.
आंदोलकांच्या मागण्या अशा : पूरग्रस्तांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, व्यापाऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत तुटपुंजी असून एक लाख रुपये मिळावेत, रुग्णालये, मंगल कार्यालये, अभियंते, वकील यांची कार्यालये, फेरीवाले, भाजीपाला व्यावसायिक, पानटपऱ्या, हातगाडे यांच्या नुकसानीचेही पंचनामे करावेत, पंचनाम्यासाठी कागदपत्रांच्या जाचक अटी रद्द कराव्यात, पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ पेक्षा जास्त मदत मिळावी.
आंदोलनात आमदार सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नितीन शिंदे, दीपक शिंदे-म्हैसाळकर, शेखर इनामदार, दिनकर पाटील, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पवार, गौतम पवार, सतीश साखळकर, अमर पडळकर, अश्रफ वांकर, विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, उमेश देशमुख, राजकुमार राठोड, महेश पाटील, रेखा पाटील, कामरान सय्यद, लालू मिस्त्री, तोहीद शेख, अविनाश जाधव, प्रदीप कांबळे, दीपक माने, गजानन आलदर, संजय यमगर, जगन्नाथ ठोकळे, लक्ष्मण नवलाई, युवराज बावडेकर, स्वाती शिंदे, कल्पना कोळेकर, गीता सुतार, भारती दिगडे, संगीता खोत, उर्मिला बेलवलकर, माधुरी वसगडेकर आदी सहभागी होते.
चौकट
इस्लामपुरात मंगळवारी मोर्चा
आंदोलकांनी सांगितले की, पूरग्रस्तांच्या मागण्या आठवडाभरात मान्य झाल्या नाहीत, तर मोर्चा काढला जाईल. तसे निवेदन अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांना देण्यात आले. याच मागण्यांसह मंगळवारी (दि. २४) इस्लामपुरात मोर्चा काढणार असल्याची माहिती निशिकांत पाटील यांनी दिली.