मिरज : मिरजेत भाजपतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन विधानसभेतील १२ भाजप आमदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
राज्यातील आघाडी सरकारच्या धोरणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ओबीसी समाजाला आरक्षण परत मिळवून देण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या आमदारांना विधानसभा सभागृहात बोलू दिले नाही. विधानसभा तालिका अध्यक्षांसमोर घोषणाबाजी केल्याच्या कारणावरून भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले. त्यामुळे आघाडी सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही हे सिद्ध झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. याबाबत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देऊन भाजप आमदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी करीत महाआघाडी सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव जयगोंड कोरे, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक गणेश माळी, शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, ओमकार शुक्ल, राजेंद्र नातू, महादेव कुरणे, पंकज मेत्रे, उमेश हारगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.