सांगली : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळते. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर काही वाहने विम्याशिवाय धावत आहेत. विशेषत: दुचाकी वाहनांची सर्वाधिक संख्या आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
सांगली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यालगतच शेणखताचे ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी, तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. दलदलीमुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, आरोग्य धोक्यात आले आहे.
प्लास्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
सांगली : शहरामध्ये अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे रस्त्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेत बायोमेट्रिक प्रणालीचा उडताेय फज्जा
सांगली : शासनाने कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरीकरिता अनेक कार्यालयांत बायोमेट्रिक मशीन बसविलेल्या आहेत. सांगली जिल्हा परिषदेतही बायोमेट्रिक मशीन बसविली होती; पण सध्या बायोमेट्रिक मशीन बंद असल्यामुळे हजेरीच होत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.