सांगली : खरीप हंगाम महिन्यावर आल्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यासाठी एक लाख ४२ हजार टन रासायनिक खत आणि ३३ हजार ६९० क्विंटल बियाणांची मागणी शासनाकडे केली आहे. खत आणि बियाणांच्या किमती १० ते १५ टक्के वाढल्यामुळे पेरणीचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवड्यात स्कायमेट संस्थेने १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. आता भारतीय हवामान खात्यानेही ९८ टक्क्यांपर्यंत पावसाचा अंदाज दिल्यामुळे खरीप हंगाम चांगला जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खते आणि बियाणांची मागणी शासनाकडे नोंदवली आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र तीन लाख ७७ हजार ३१३ हेक्टर आहे. यावर्षीही पाऊस चांगला असल्यामुळे पेरणी १०० टक्क्यांवर होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भात, ज्वारी, बाजरी, तूर, मुग, उडीद, भूईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, मका आदी पिकांचे ३३ हजार ६९० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यात ऊस आणि तासगाव, खानापूर, मिरज पूर्व, कठेमहांकाळ, जत, आटपाडी तालुक्यात द्राक्ष, भाजीपाल्याचे पीकही जास्त आहे. याबरोबरच खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचीही मागणी वाढणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने युरिया, डी.ए.पी, एम.ओ.पी, एस.एस.पी. आदीचे एक लाख ४२ टन खताची मागणी केली आहे. शिराळा तालुक्यात वळवाचा पाऊस झाल्यानंतर मेच्या पहिल्या आठवड्यात धूळवाफेवर भाताची पेरणी केली जाते. शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून लवकरच खताची मागणी होते.
चौकट
खरीप हंगामासाठी बियाणांची मागणी
बियाणे प्रकार मागणी क्विंटल
भात ६५३८
खरीप ज्वारी ६०८७
बाजरी २५२२
तूर ३६३
मूग ४०३
उडीद ५६५
भूईमूग १०९९
सोयाबीन ९७२४
सूर्यफूल १२९
मका ६२१०
कापूस ५०
एकूण ३३६९०
चौकट
रासायनिक खताची मागणी
तालुका टन
आटपाडी ८०६०.५
जत ११२४२
कडेगाव ११००३
कवठेमहांकाळ १२७८०
मिरज १०८७५
पलूस २२२२०
शिराळा १७२०१
तासगाव १०९३२
खानापूर १२०१३
वाळवा २५८३०
एकूण १४२१६०