सांगली : राज्यातील एलबीटी (स्थानिक संस्था कर) विनापर्याय हटविला पाहिजे, अशी मागणी आपण निवेदनाद्वारे महाराष्ट्र व्यापारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा, सचिव सुभाष सारडा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून, एलबीटी विनापर्याय हटविण्यात यावा अशी मागणी केली होती. महापालिकेमध्ये जकात कराचे विविध स्वरुपात उपकर, स्थानिक संस्था कर असे नामकरण करुन भ्रष्टाचाराची कुरणे सुरु आहेत. याचा उद्योग, व्यापारावर परिणाम झाला आहे. एलबीटीबाबत भाजपने निवडणुकीपूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे स्थानिक संस्था कर विनापर्याय हटविला पाहिजे. राज्याचा विकास व्यापार, उद्योग वाढीवर अवलंबून असतो. त्यामुळे विविध प्रश्नांवर व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेबरोबर चर्चा करण्यासाठी व्यापक बैठक बोलावण्यात यावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे शहा यांनी सांगितले. एलबीटी हटवला नाही तर व्यापाऱ्यांच्या शिखर संघटना एकत्रित बोलावून राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
विनापर्याय राज्यातील एलबीटी हटवा
By admin | Updated: November 7, 2014 23:38 IST