सांगली : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आता प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उघडण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात काही ठिकाणी दुष्काळाने, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याचे पंचनामे १० मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले आहेत. केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राज्य शासनच आता यासाठी पुढाकार घेणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल आल्यानंतर यासाठी किती मदत द्यायची, याची घोषणा विधिमंडळातच करण्यात येईल. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज समजण्यासाठी आता प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उभारण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारी घेण्यास मदत होणार आहे. अवकाळीने झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांना मदत देताना शासन केवळ नियमावर बोट ठेवून काम करणार नाही. जास्तीत जास्त शेतकरी कसे उभे राहतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबरपासून अवकाळीने झालेल्या नुकसानीसाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अवकाळी व दुष्काळासाठी गेल्या वर्षभरात ४२०० कोटी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अवकाळीग्रस्तांसाठी अधिवेशनात घोषणा!
By admin | Updated: March 6, 2015 00:53 IST