शिराळा : स्वतःचे गाव कोरोनामुक्त करण्यासाठी युवक व स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये ईर्षा निर्माण झाली पाहिजे. गावपातळीवर स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
नाईक म्हणाले, नागरिकांना शिस्त लावण्याकरिता गावागावांतील युवकांबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांना घरामध्ये स्वतंत्र राहण्याची किंवा स्वतंत्र शौचालय व बाथरूमची व्यवस्था नसल्याने अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा विचार करून ग्राम समित्यांनी दक्ष राहावे. ज्यांच्याकडे अशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्यांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यासाठी आग्रही राहावे.
उत्सव साजरे करताना ज्या पद्धतीने युवक मंडळे जागरूक असतात, त्याच पद्धतीने सध्या जनजागृती करून हा रोग हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. याबाबत ईर्षात्मक लढाई लढणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.