ओळी :- शहरातील ‘बिगर अत्यावश्यक सेवे’तील दुकाने सुरू करण्याबाबत व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा प्रशासनाने ‘अत्यावश्यक सेवे’तील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाचा पाॅझिटिव्हीटी दरही कमी झाला आहे. त्यामुळे ‘बिगर अत्यावश्यक सेवे’तील दुकानेही सुरू करण्यास परवागनी द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. याबाबत आढावा घेऊन लवकरच शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिका क्षेत्रात पाॅझिटिव्हीटी दर कमी झाला आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांत आढावा घेऊन शासनाला प्रस्ताव पाठवू. तोपर्यंत व्यापाऱ्यांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले. बाजारपेठ सुरू व्हावी, अशीच प्रशासनाची इच्छा आहे. त्यासोबतच कोरोना नियंत्रणात येणे आवश्यक आहे. दुकाने सुरू केल्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढल्यास कडक निर्बंध लावावे लागतील. अशी स्थिती येऊ नये, यासाठी प्रशासन दक्षता घेत असल्याचे सांगितले.
जिल्हा पोलीसप्रमुख गेडाम म्हणाले, अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकानेही सुरू असतात. नाईलाजाने त्यांच्यावर कार्यवाही करावी लागते. त्यामुळे परवानगी नसलेले दुकाने सुरू ठेवू नये, अन्यथा पोलिसांनी सक्ती करावी लागेल, असा इशारा दिला. पुढील आठवड्याच्या आढावा बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ,असे आश्वासन त्यांनी दिल्याचे शहा यांनी सांगितले.