नेलकरंजी : आटपाडी तालुक्यातील पर्यटन क्षेत्र शुकाचार्य येथे मठाधिपती नेमणुकीवेळी प्रचंड वादंग निर्माण झाला. पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतर मठाधिपतीपदी भास्करगिरी महाराजांची नेमणूक करण्यात आली. पर्यटनस्थळ शुकाचार्य येथील मठाधिपती शिवगिरी ऊर्फ दिलीपगिरी महाराज यांचे ८ एप्रिल रोजी निधन झाले होते. त्यानंतर दि. २३ एप्रिल रोजी त्यांचा अंत्यविधी सोहळा व मठाधिपती नेमणूक घेण्यात आली. मात्र शुकाचार्यचे पूर्वीचे किसनगिरी महाराज यांचे शिष्य म्हणून दिलीपगिरी आणि उमेशगिरी हे होते. तद्नंतर किसनगिरी यांच्या देहावसानानंतर मठाधिपती म्हणून दिलीपगिरी महाराज गादीवर बसले. त्यानंतर दिलीपगिरी यांच्या निधनानंतर गादीवर कोण बसणार? असा प्रश्न होता. दिलीपगिरी यांचे शिष्य भास्करगिरी महाराज आहेत. त्यामुळे याबाबत आठ दिवस उलट-सुलट चर्चा भक्तवर्ग आणि साधू-संतातून होती. आज मठाधिपती नेमणुकीवेळी अनेक साधू-संत भक्तगण व परिसरातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. दुपारी नेमणुकीवेळी भास्करगिरी की उमेशगिरी, असा वाद पेटला. हा वाद मिटवण्यासाठी आटपाडी, विटा येथील पोलीस फौजफाटा मागवावा लागला. शेवटी साधू-संत, भक्तगण यांच्या चर्चेनुसार भास्करगिरी महाराज यांची नेमणूक अखेर मठाधिपतीपदी केली. तत्पूर्वी दिलीपगिरी महाराज यांचा समाधी सोहळा भास्करगिरी महाराज व साधू-संत यांच्याहस्ते पार पडला. त्यानंतर बोडशिया कार्यक़्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमास महंत श्री सुंदरगिरी महाराज (पुसेगाव), संतोष महाराज (शिखर शिंगणापूर), चैतन्य भारती, बजरंगिरी महाराज, महेशगिरी महाराज, पोपटगिरी महाराज, अमृतगिरी महाराज यांच्यासह हजारोंच्या संख्येने भक्तगण, नागरिक उपस्थित होते. पोलीस फौजफाटा या गोष्टी कराव्या लागल्याने उलट-सुलट चर्चा रंगल्या होत्या. (वार्ताहर)
शुकाचार्य मठाधिपती नेमणुकीवेळी वाद
By admin | Updated: April 24, 2015 01:16 IST