शिराळा : जांभळेवाडी (ता.शिराळा) येथील ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादीचे दादासाहेब मांगलेकर, उपसरपंचपदी प्रा. डॉ. सचिन मरळे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.
ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी आर. एस. माने, ग्रामसेविका श्रद्धा पाटील यांच्या उपस्थितीत ही निवडणूक झाली.
यावेळी रेश्मा मरळे, सयाजीराव देवकर, वैशाली साळुंखे, प्रा. डॉ. सचिन मरळे, स्वाती कडवेकर, दादासाहेब मांगलेकर हे सर्व सदस्य उपस्थित होते. विरोधी गटाच्या शारदाताई जाधव या गैरहजर होत्या. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्रामविकास पॅनलने ही निवडणूक सहाविरुद्ध एकने जिंकली होती. नूतन पदाधिकारी यांचा निवडीनंतर प्रचितीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.