सांगली : दारूच्या नशेत ड्युटी करुन प्रवाशांना तिकिटे दिल्याप्रकरणी एसटीतील वाहक दीपक अंकुश माळी (रा. विटा) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, गुरुवारी रात्री सांगली-विटा प्रवासादरम्यान हा प्रकार घडला.गुरुवारी रात्री सव्वाआठला सांगलीच्या मुख्य बसस्थानकावरुन एसटी बस विट्याला जाण्यासाठी निघाली होती. एसटीत दीपक माळी हा वाहक म्हणून ड्युटीवर होता. तो दारूच्या नशेत प्रवाशांना तिकिटे देत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. यामुळे प्रवाशांनी वसंतदादा साखर कारखाना परिसरात प्रवाशांनी बस थांबविली व माळी यास ‘नशेत ड्युटी करता काय?’ असा जाब प्रवाशांनी विचारला. त्यावर त्याने प्रवाशांशी वाद घातला. यातून तणाव निर्माण झाला होता. प्रवाशांनी या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलीस तातडीने दाखल झाले. रात्री उशिरा माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. दोन तास हा गोंधळ सुरु होता. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. माळी याच्या वर्तनाचा एसटी महामंडळास अहवाल सादर केला जाणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
नशेत ड्युटी करणाऱ्या एसटी वाहकावर गुन्हा
By admin | Updated: March 20, 2015 23:17 IST