कुपवाड : अलकूड (एम) (ता. कवठेमहांकाळ) येेेथील डोंगरावर आढळून आलेल्या बिबट्याला काही दिवसांपूर्वी शिकारी कुत्र्यांच्या मदतीने पाठलाग करून पळवून लावल्याप्रकरणी अलकूड (एम) येथील आठ तरुणांवर वन विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधित आठ जणांना सांगलीच्या वन विभागाने नोटिसा बजावून त्यांची कसून चौकशी केली असल्याची माहिती सहायक उपवनसंरक्षक विजय गोसावी यांनी दिली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकूड (एम) परिसरातील डोंगरावर रविवार, दि.१३ जून रोजी दुपारी १ वाजेदरम्यान ग्रामस्थांना बिबट्या दिसला. ही घटना समजताच गावातील तरुणांनी बिबट्याला हुसकावण्याच्या उद्देशाने सोबत शिकारी कुत्री घेऊन अलकूड (एम)च्या डोंगरावरून करोली (एम) रस्त्यालगत असलेल्या तलावापर्यंत पाठलाग केला होता; परंतु काही वेळातच बिबट्या उसाच्या फडात अदृश्य झाल्याने त्या तरुणांनी पाठलाग करणे थांबविले. यादरम्यान, बिबट्या अलकूड (एम) परिसरात आल्याची माहिती सांगलीच्या वन विभागाला समजल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी काही तरुण शिकारी कुत्र्यांच्या मदतीने बिबट्याला हुसकावण्यास गेल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी त्या आठ जणांना नोटिसा बजावून शुक्रवारी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, तसेच त्यांना सांगलीच्या वन विभागाच्या कार्यालयात बोलावून कसून चौकशी केली असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.