यावेळी बजरंग पाटील, सुजाता इंगळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी शनिवारी शिवसेनेच्या बैठकीत केले.
सांगलीतील एका मंगल कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी विभुते म्हणाले की, जिल्ह्यात संपर्क अभियान सुरु होणार आहे. याचा प्रारंभ १२ जुलैला सकाळी १० वाजता शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्याहस्ते सांगलीच्या गणपती मंदिरापासून होणार आहे. त्यानंतर ही संपर्क यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून शिवसेना जिल्हा कार्यालयाला भेट देऊन रिसाला रोड रोड, बदाम चौक, नळभाग, नगारजी गल्लीतून जाणार आहे. त्यानंतर संघटक दिगंबर जाधव यांच्या निवासस्थानी परिसरातील नागरिकांची भेट घेतली जाणार आहे.
शहरात ठिकठिकाणी भेटी देऊन सायंकाळी साडेपाच वाजता कुपवाड येथे शहरप्रमुख अमोल पाटील व शहर संघटक सुरज कासलीकर यांच्या नियोजनानुसार दुर्गानगर येथे बैठक होणार आहे. कुपवाडमध्येही नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.
ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी यासाठी कामाला लागावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात राबविलेल्या अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी.
बैठकीस दिगंबर जाधव, बजरंग पाटील, सुजाता इंगळे, संदीप गिड्डे, अरुण खरमाटे, शंभूराज काटकर, सुभाष मोहिते, सागर मलगुंडे, प्रतिभा शिंदे, रणजित जाधव आदी उपस्थित होते.