तासगाव : तासगाव नगरपालिका विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी काका गटाच्या नगरसेवकांची पक्षीय बैठक झाली. इच्छुक नगरसेवकांची संख्या जास्त झाल्याने बैठकीत एकमत झाले नाही. त्यामुळे सभापती निवडीचा चेंडू आता खासदारांच्या कोर्टात गेला असून, शुक्रवारी विशेष सभा होणार आहे.तासगावात नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच झाल्याचे चित्र असतानाच, आता सभापती पदासाठीदेखील नगरसेवकांची रस्सीखेच सुरु झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी काका गटाच्या नगरसेवकांची पक्षीय बैठक झाली. यावेळी निवड होणाऱ्या सभापतींसाठी ही अखेरची टर्म ठरणार आहे. त्यामुळे काका गटातील बहुतांश नगरसेवकांनी, सभापती पदासाठी आपणालाच संधी मिळावी, यासाठी आग्रह धरला आहे. तत्कालीन नगराध्यक्षा सुशिला साळुंखे, पक्षप्रतोद अनिल कुत्ते, राजू म्हेत्रे, शरद मानकर, विजया जामदार, जयश्री धाबुगडे, शिल्पा धोत्रे, सारिका कांबळे या नगरसेवकांनी सभापती पदावर दावा सांगितला. यापैकी तीन नगरसेवकांना सभापती पदाची संधी मिळणार आहे. मात्र नेमकी कोणाची निवड करायची, याबाबत नगरसेवकांत एकमत झाले नाही. त्यामुळे याबाबत खा. संजयकाका पाटील यांच्याकडूनच नावे निश्चित करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी संजयकाकांशी चर्चा करुन नावे निश्चित करण्याचा निर्णय झाला. (वार्ताहर)अविनाश पाटलांना सभापतीपद नाकारले नगरसेवक अविनाश पाटील यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत होते. नगराध्यक्ष म्हणून बाबासाहेब पाटील यांचे नाव जाहीर झाल्यानंतर, त्यांनी अप्रत्यक्ष नाराजीही व्यक्त केली होती. मात्र गुरुवारी झालेल्या बैठकीत अविनाश पाटील यांनी सभापती पदावर दावा सांगितला नाही. याउलट सभापती पदासाठी इतर नगरसेवकांचीच शिफारस केली. त्यांच्या या भूमिकेचीही अन्य नगरसेवकांत चर्चा झाली.
सभापती निवडीचा चेंडू खासदारांच्या कोर्टात
By admin | Updated: December 17, 2015 22:49 IST