तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या २४१ जागांसाठी चुरशीने ७८ टक्के मतदान झाले. ९ फेऱ्यांत २४ टेबलांवर मतमोजणी होणार असून, निवडणूक अधिकारी तहसीलदार दगडू कुंभार यांच्या नेतृत्वाखाली २२ निवडणूक निर्णय अधिकारी, १९ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, २४ पर्यवेक्षक, ४८ सहाय्यक मतमोजणी पर्यवेक्षक व सुमारे दोनशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. उमेदवार व प्रतिनिधींना सकाळी ९ वाजता मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत २२ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणी कक्षात तीन ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. निकाल जाहीर करण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.