सांगली : बक्षीसपत्राची उताऱ्यावर नोंद घेत सिटी सर्व्हे उतारा देण्याच्या मोबदल्यात ७५ हजारांची लाच घेताना नगरभूमापन अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणातील अधिकारी सुरेश शिवमूर्ती रेड्डी (वय ४८, रा. गव्हर्न्मेंट कॉलनी, सांगली) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तक्रारदाराच्या वडिलांनी तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावाने बक्षीसपत्राने मालमत्ता लिहून दिली होती. या बक्षीस पत्राची सिटी सर्व्हे उताऱ्यावर नोंद घेऊन, त्याचा उत्तारा देण्याच्या मोबदल्यात रेड्डी याने तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती तर ७५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.